औरंगाबाद- हॉटेलमधून थेट पार्सल जेवण ऑर्डर करण्यासाठी सध्या झोमॅटो या मोबाईल अॅपचा मोठ्याप्रमाणात वापर होत आहे. मात्र झोमॅटोवरुन पनीर चिल्ली मागविल्यानंतर हॉटेलमधून फायबर आणि प्लास्टीकचे तुकडे घरी आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
शहरातील इंदीरानगर, बायजीपुरा
येथील रहिवासी सचिन पांडुरंग जमधडे यांनी गुरुवारी (ता.१७) हॉटेल एस.क्वेअर मधून झोमॅटोवरुन
पनीर चिल्ली मागवली होती. मात्र सचिन यांच्या पत्नीने आणि मुलाने ते खाल्यानंतर त्यात
फायबर आणि प्लास्टीकचे तुकडे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ताबडतोब हॉटेलमध्ये
जाब विचारण्यासाठी धाव घेतली. मात्र हॉटेल मालकाने अरेरावी करत उडवाउडवीची उत्तरे
दिली. त्यामुळे या प्रकाराविरोधात सचिन यांनी हॉटेलमालक आणि झोमॅटोविरोधात जिन्सी
पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे.
हा प्रकार गंभीर असून अशा
प्रकारच्या जेवणाच्या सेवनामुळे माझ्या मुलाला गंभीर इजा होऊ शकली असती, त्यामुळे संबंधितांवर
कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. यापूर्वी असे अनेक प्रकार समोर आले
आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या सुविधा देणाऱ्या मोबाईल अॅपच्या विश्वासर्हातेवर
प्रश्न उपस्थित होत आहे.